नवी दिल्ली ः चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणा भूषवणार असल्याची घोषणा केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरियाणाचे मुख्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज केली. टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.
हरियाणातल्या पंचकुला इथे या स्पर्धा होणार आहेत. हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग, क्रीडा सचिव रवी मित्तल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महा संचालक संदीप प्रधान यांच्या उपस्थीतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही घोषणा करण्यात आली. चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे सोपवण्यात आल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचे रीजीजू यांनी सांगितले.आपल्या पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धांमुळे देशातल्या तळापर्यंतच्या कौशल्याचा शोध घेता आला यातून पुढे आलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हा खेळाचा महाकुंभ आहे. हरियाणाला भक्कम क्रीडा संस्कृती लाभली असून या राज्याने देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत.
भागीदारीविषयी बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले की स्टार स्पोर्ट्स ने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा देशाच्या क्रीडा कॅलेंडरच्या वार्षिक कार्यक्रमात आणल्या आहेत. जेव्हा एखादा युवा खेळाडू स्वतःला राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहतो तेव्हा केवळ खेळाडूलाच नव्हे तर याचे प्रसारण पाहणाऱ्या इतर युवकांनाही क्रीडा विश्व आपली कारकीर्द घडवण्यासाठीचे क्षेत्र म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असते.ही भागीदारी सुरु रहात असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले.
आधीच्या तीन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरीयानाने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. २०१९ आणि २०२०च्या या स्पर्धात राज्याने दुसरे स्थान (२०० पदके २०२०मध्ये आणि १५९ पदके २०१९मध्ये ) तर २०१८ मध्ये १०२ पदके (३८सुवर्ण, २६रौप्य, ३८कांस्य) पदकांच्या कमी कमाई सह सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.