मुंबई – कर बुडवल्याच्या आरोपावरून प्राप्तीकर विभागानं अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपसह अनेक चित्रपटांशी संबंधित लोकांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. आयटी विभागाच्या या कारवाईवर तापसी पन्नूनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिच्यावरील आरोपांचं तिनं विनोदी ढंगानं ट्विट करून उत्तर दिलं आहे.
पॅरिसमध्ये तिच्या नावावर कोणताच बंगला नाही आणि ५ कोटी रुपये दिल्याची कोणतीही पावती नाही. २०१३ मध्ये तिच्या संपत्तीवर कोणताही छापा पडला नाही, असं तापसीनं स्पष्ट केलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आरोपाला उत्तर देताना ती म्हणाली, ती आता इतकी स्वस्त राहिलेली नाही. प्राप्तीकर विभागानं कोणत्या गोष्टींची झडती घेतली याबाबत तापसीनं सलग ट्विट करत माहिती दिली. तीन दिवसात महत्वाच्या तीन गोष्टींची झडती घेण्यात आली.
पहिल्या ट्विटमध्ये तापसी म्हणाली, कथित बंगल्याची चावी मी पॅरिसमध्ये ठेवते. कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. दुसऱ्या ट्विटमध्ये ती म्हणाली, कथित पाच कोटी रुपयांची पावती भविष्यासाठी ठेवली आहे.
तापसीच्या घराची झडती घेताना पाच कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याची पावती तिच्या घरातून मिळाल्याचा दावा प्राप्तीकर विभागानं केला होता. शेवटच्या ट्विटमध्ये ती म्हणाली, माननीय अर्थमंत्र्यांनुसार, २०१३ मध्ये माझ्या घरी छापे पडले होते. मात्र मी आता इतकी स्वस्त राहिले नाही.
२०१३ मध्ये अशी कारवाई झाली होती, पण त्यावर कोणी, काही का बोललं नाही, असं म्हणत कोणाचेही नाव न घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली होती.