नवी दिल्ली – तुळशीच्या लग्नापासून सगळीकडे लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. या काळात चोऱ्यांचे प्रमाणही वाढते. यामुळे दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. त्यामध्ये काही टोळ्या लग्नसमारंभात मुलांच्या मदतीने चोऱ्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यंदा कोरोनामुळे मोठ्या समारंभांवर बंदी असली तरी काही उत्साही लोक मोठ्या प्रमाणात सोहोळे करताना दिसतात. त्यामुळे पोलिसांच्या या सूचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल की, या टोळ्यांमधील चोरी करणारी जी मुले असतात ती त्यांच्या आई वडिलांनी याच कामासाठी भाड्याने दिलेली असतात.
लग्नाच्या सीझनमध्ये अशा चोरी करणाऱ्या टोळ्यांचा भाग बनण्यासाठी ९ ते १५ वर्षांची मुले भाड्याने देतात. मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्या तील ही मुले दिल्ली एनसीआर, लुधियाना आणि चंदीगड या शहरांमध्ये चोरीसाठी त्यांचा वापर केला जातो. लग्नाच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मुले समारंभात घुसतात आणि दागिने वगैरेसारख्या मौल्यवान वस्तूंची चोरी करतात. मध्यंतरी पोलिसांनी अशा टोळ्यांमधील काही जणांना अटक केली त्यात दोन किशोरवयीन मुले होती.
भाड्याने दिलेल्या या मुलांना नंतर चोरीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांमध्ये कसे मिसळावे हे देखील त्यांना शिकवले जाते. कधी अटक झालीच तर त्यांनी काही माहिती देऊ नये म्हणूनही त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केले जाते, असे पोलिसांनी सांगितले आहे.