नाशिक : जबरी लुटीतील वाहनासह मद्यसाठा पोलीसांचा हाती लागला असून, या घटनेत ट्रक मालकच मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे. सराईत गुन्हेगारांच्या मदतीने चालकास गाफिल ठेवत ही लुट करण्यात आली असून मालेगाव मनमाड मार्गावरील व-हाणेपाडा येथील एका बंदीस्त घरात हा मद्यचा साठा मिळून आला आहे. ट्रक मालकाच्या ताब्यात गावठी पिस्तूल आढळून आल्याने त्यास बेड्या ठोकण्यात आल्या असल्या तरी त्याचे साथीदार कारमधून पसार झाले आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
मंदार हरी कुलकर्णी (३९ रा.हरिपुष्प बंगला,साईनाथनगर) असे अटक केलेल्या पिस्तूलधारी ट्रक मालकाचे नाव आहे. सोमवारी (दि.१८) रात्री इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात ही घटना घडली होती. जगदिश संपत बोरकर (३७ रा.राजवाडा,विल्होळी) या ट्रक चालकाने याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बोरकर सोमवारी दिंडोरी तालूक्यातील सिग्राम – पेरनॉड रिकॉर्ड इंडिया लि. या कारखान्यातून आपल्या ताब्यातील आयशर ट्रक (एमएच ४८ बीएम १६१०) मध्ये मद्यसाठा भरून पनवेल (मुंबई) येथे पोहच करण्यासाठी निघाले असता ही घटना घडली होती. प्रवास खर्चासाठी ते मालकाची वाट बघत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आपल्या वाहनासह थांबले असता लुटमारीचा प्रकार घडला. अज्ञात चार जणांच्या टोळक्याने त्यांना गाठून जबरदस्तीने वाहनाचा ताबा घेतला. या वेळी टोळक्याने चालकास मारहाण करीत चालकाच्या कॅबीनमध्ये डांबून ठेवत मालट्रक महामार्गावरून पळवून नेला. उमराणे शिवारात चालक बोरकर यांना बेदम मारहाण करीत टोळक्याने वाहनातून खाली उतरवून देत मद्यसाठा घेवून पसार झाले होते. या आयशर ट्रक मध्ये १ कोटी ४३ लाख ३८ हजार ६१० रूपये किमतीचा मद्यसाठा होता. पोलीस लुटारूंच्या मागावर असतांनाच या गुह्यात सराईत गुन्हेगार किरण साळूंकेचा हात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली. खब-याच्या माहितीवरून पोलीस त्याचा मालेगाव मनमाड मार्गावर शोध घेत असतांना साई सेवा सैनी ढाबा समोर लुटीतील वर्णनाचा मालट्रक बेवारसस्थितीत आढळून आला. पोलीसांनी निरीक्षण केले असता लुटारूंनी पळवून नेलेल्या ट्रकला एमएच १७ एजी ६३६३ हा क्रमांक रेडिअमने चिटकविण्यात आल्याचे पुढे आले. वरिष्ठांना कळवून पथक साळूंकेच्या शोधात निघाले असता व-हाणेपाडा येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या घराजवळ कारमधून संशयीतासह टोळक्याने धूम ठोकली. ही बाब लक्षात येताच पोलीसांनी सदर घराची झडती घेतली असता तेथे मद्यसाठा मिळून आला. ट्रकसह मद्यसाठा पोलीसांनी हस्तगत केला असून मुद्दमाल मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. दरम्यान साईनाथनगर चौफुली भागात एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाव घेत संशयीत कुलकर्णी यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात गावठी पिस्तूलसह दोन जीवंत काडतुसे मिळून आले. पोलीस तपासात तोच लुटमारीतील मालट्रकचा मालक असल्याचे पुढे आले असून त्यानेच चालकास गाफिल ठेवत या लुटमार घडवून आणल्याची कबुली दिल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर व युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,दिनेश खैरणार उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे,जमादार काळू बेंडकुळे,विजय गवांदे,यवाजी महाले,रविंद्र बागुल,संजय मुळक,वसंत पांडव,अनिल दिघोळे,प्रविण कोकाटे,नाझीम पठाण,विशाल काठे,फय्याज सय्यद,आसीफ तांबोळी,दिलीप मोंढे,मोतीराम चव्हाण,योगीराज गायकवाड,महेश साळुंके,प्रविण वाघमारे,मनोज डोंगरे,मोहन देशमुख,शांताराम महाले,रावजी मगर,राजेश लोखंडे,विशाल देवरे,प्रविण चव्हाण,गणेश वडजे,राम बर्डे,राहूल पालखेडे,निलेश भोईर,समाधान पवार,गौरव खांडरे,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.
….