नाशिक – भाजीपाल्याचे दर कडाडल्याने चोरट्यांनी आता थेट भाजीपाला चोरण्यास प्रारंभ केला आहे. रविवारी रात्री काही अज्ञातांनी चक्क बटाटा, लसूण, मिर्ची, कांदा या भाजीपाल्यावर डल्ला मारल्याची बाब उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल ४० हजाराचा भाजीपाला लांबवला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नगर भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते मनोज सांगळे यांनी रविवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून भाजी साहित्य नेहमी प्रमाणे ओट्यावर ठेवून घरी गेले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे भाजीविक्रीसाठी बाजारात आले असता भाजीपाला गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी ५५ किलो लसूण, ५५ किलो बटाटे, ६ पॅकेट मिर्ची असा अंदाजे ३० हजार रुपयांचा भाजीपाला लंपास केला. तर बेबीबाई शिंदे यांच्या दुकानातून ५५ किलो बटाटे, ३० किलो लसूण असा अंदाजे १० हजार रूपये भाजीपाला चोरून नेला आहे. लॉकडाऊन नंतर बेरोजगारी वाढली असल्याने आणि बटाटा, लसूण व इतर भाज्यांच्या किंमती वाढल्याने चोरांनी त्यांचा मोर्चा महागड्या भाजीपाल्याकडे वळविला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी भुरट्या चोरांनी जाधव संकुल येथील एका किराणा दुकानातून मिठाच्या ५ गोण्यांची चोरी केली होती.