नाशिक – चेष्टा मस्करीत मित्राचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धमान देसाई यांनी १० वर्षे कारवास आणि ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २०१७ मध्ये जुने नाशिक परिसरातील तळवाडी भागात घडली होती.
विन्या उर्फ गणेश राजाराम जाधव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत संपत काशिनाथ कडाळी आणि आरोपी जाधव हे मित्र होते. मूळचे दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे युवक विविध व्यसने करीत भद्रकाली परिसरात फिरस्ते म्हणून राहत होते. २८ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळच्या सुमारास तळवाडी भागात दोघां जणांमध्ये चेष्ट मस्करी सुरू होती. यावेळी मयत कडाळी याने जाधव ला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या विन्या जाधव याने जवळच असलेल्या हात गाड्यावरील चाकू उचलून कडाळी याच्यावर हल्ला केला होता. या घटनेत कडाळी याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, तत्कीलन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेरखान उर्फ शेरू पठाण यांनी तपास सुरू केला. हवालदार इकबाल पिरजादे तसेच पोलिस शिपाई बबन शिलगर यांच्या मदतीने पठाण यांनी बारकाईने सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या घटनेत फिरस्ते असलेल्या आरोपी आणि मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यापासून ते अत्यंविधीचे सोपस्कर पोलिसांनी पार पाडले. हवालदार शेरू पठाण यांनी लेखनिक मदतनीस म्हणून आजवर केलेल्या कामामध्ये सहा हत्यांचे, दोन बलात्कार व पोस्को तसेच एका हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.