नाशिक – शहरातील चेन स्नॅचिंगमध्ये महिन्याभरापासून वाढ झाली आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी शहरातील भागात चेन स्नॅचिंग झाल्याचे आढळून आले आहे. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी व चेन-स्नॅचिंग करणाऱ्यांना चाप लागावा यासाठी शहर पोलिसांनी अक्रम पवित्रा घेतला आहे. तपासणीचा भाग म्हणून शहरातील विविध भागातील १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेराद्वारे स्कॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्याभरापासून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यावर बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीचा भाग म्हणून साखळी चोरांना पकडण्यासाठी शहरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा सक्रीय करण्यात आले आहेत. त्याद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरु असून लवकरच साखळी चोर पकडले जातील अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली आहे. साखळी चोरीची गंभीरपणे दाखल घेत तपासाचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीन ते चार साखळी चोरांसंबंधी पुरेसे पुरावे मिळाले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे ते म्हणाले. साखळी चोर वृद्ध महिलांना हेरुन लक्ष करत असल्याचे पाण्डेय म्हणाले.
साखळी चोर हे प्रामुख्याने दुसऱ्या राज्यातील असून चोरी करताच त्यांनी पलायन केले असल्याचे नाकारता येत नाही तसेच आता स्थानिक साखळी चोरांचा यात हात असल्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.