मनाली देवरे, नाशिक
….
अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी मात्र प्ले ऑफचे दरवाजे जवळ जवळ बंदच झाले. स्पर्धेतील स्वतःचे अस्तीत्व टिकविण्याच्या आशा जिवंत ठेवून विजेतेपदाचे हॉट फेव्हरीट असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा झटका होता.
१२५ धावांचा पाठलाग करतांना राजस्थानची सुरूवातीला पडझड झाली होती. ३ बाद २८ अशी दयनीय अवस्था असतांना चेन्नईची या सामन्यावर पकड होती. परंतु, कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या जोडीला जॉस बटलरने विजयाची मोहीम हातात घेतली आणि अखेरीस विजयासाठी असलेल्या १२६ धावा करूनच ते मैदानावरून परतले. ७ गडी राखून झालेला हा पराभव चेन्नईच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागल्याने ते नाराज होणे स्वाभाविक आहे. परंतु, स्पर्धेतील आत्तापर्यन्तच्या कामगिरीनुसार, चेन्नईला स्वतःच्या दर्जाशी साजेशा खेळ करताच आलेला नसल्याने हा पराभव अपेक्षेप्रमाणेच होता.. एका चांगल्या गोलदाजांची कमतरता या सामन्यात देखील धोनीला जाणवली. स्मिथ आणि बटलर यांची भागीदारी मोडून काढण्यात चेन्नईला १५ षटकात एकदाही यश आले नाही.
चेन्नई सुपर किंग्जला या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु, तरीही चेन्नईला सामन्यात रणनिती आखून खेळताच आले नाही. टॉस जिंकल्यानंतर धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला त्याचवेळेला लक्षात आलं की धोनीला धावांचा पाठलाग करण्याची रिक्स घ्यायची नव्हती. परंतु, चांगले टारगेट सेट करण्यात देखील चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरले. सॅम करण, डुप्लेसी आणि शेन वॉटसन हे पहिले तीन फलंदास स्वस्तात परतल्यानंतर अंबाती रायडुने मध्यल्या फळीत थोडीशी धडपड केली. परंतु, संघासाठी एकहाती डाव फिरवण्याची जिद्द त्याच्या खेळात आढळून आलीच नाही. तो १३ धावात परतल्यानंतर धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यालाही २८चेंडून २८ धावा यापलिकडे फारसे काही दिव्य साधता आले नाही आणि एकटया रविंद्र जाडेजाने मिळतील तेव्हढया चेंडूवर एक ३५ धावांची छोटीशी तडाखेबंद खेळी करून संघासाठी १२५ असे विजयासाठी पुरेसे नसलेले टारगेट राजस्थान रॉयल्सला दिले. चेन्नईच्या संघात मोठया नावांची कमतरता नाही. २०-२० षटकांच्या सामन्यातले रथी–महारथी संघात आहेत. परंतु ते अपयशी कुणासमोर ठरले तर, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागी या राजस्थानच्या छोटया गोलंदाजा विरूध्द. या तिनही गोलंदाजांनी १२ षटकात मिळून अवघ्या ६७ धावा दिल्या (षटकामागे ५.५८ धावा) आणि प्रत्येकाने एक बळी देखील घेतला. राजस्थानच्या जोफ्रा आर्चर बद्दल काय बोलणार?. त्याने देखील ४ षटकात अवघ्या २० धावा दिल्या.
मंगळवारची लढत
रविवारी मुंबई इंडियन्स विरूध्द सलग दोन सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला चित्तथरारक सामना जिंकल्यानंतर सहाजिकच किंग्ज इलेव्हन पंजाबचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. ख्रिस गेलने संघात परत येतांना “ कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय रहाणार नाही” अशा अविर्भावात आरोळी ठोकून , संघाला जिंकण्याचा फंडा अवगत करून दिला आहे. अशा परिस्थितीत आता मंगळवारी या संघाचा दिल्ली कॅपिटल्स या बलाढय संघाशी सामना होणार आहे. या सिझनमध्ये दिल्लीची राजधानी एक्सप्रेस सुसाट धावते आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने या राजधानी एक्सप्रेसला रोखले तर गुणांच्या टेबलमध्ये खुप सारे उलटफेर बघायला मिळतील.