मनाली देवरे, नाशिक
…..
आयपीएलच्या या मोसमात प्रतिष्ठेला साजेसे प्रदर्शन न केल्याने टीकेचे धनी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर एका महत्त्वपूर्ण सामन्यात २१ धावा आणि एक चेंडु राखुन विजय मिळवला. निम्मे सामने संपलेले असताना केवळ ६ गुण खात्यात असलेली ही चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरू पहात होती. परंतु या विजयाने ती आता पुन्हा एकदा रुळावर आली आहे.
चेन्नईला जिंकवले गोलंदाजांनी
१६७ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान खेळपट्टीवर उभा होता तोपर्यंत हा सामना चेन्नईच्या हातून पुन्हा एकदा जातो की काय ? असेच चित्र दिसत होते. परंतु राशिद खान हिट विकेट बाद झाला आणि तिथेच सनरायझर्स हैद्राबाद साठी विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. केन विल्यमसनने केलेल्या ५७ धावा सनरायझर्सला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकल्या नाही. अर्थात, या विजयाचे श्रेय पूर्णपणे चेन्नईच्या गोलंदाजांनाच द्यावे लागेल. सॕम करन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर कर्ण शर्मा आणि ब्रावो यांनी महेंद्रसिंग धोनीच्या क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी केली आणि त्याचमुळे विजयाचे हे कठीण गणित चेन्नईला अखेरच्या षटकात सोडवता आले.
दमदार फलंदाजी
चेन्नईच्या फलंदाजांना आयपीएलच्या या मोसमात प्रथम फलंदाजी करून विरुद्ध संघाला धावांचे टार्गेट देण्याची संधी, आठ सामन्यात पहिल्यांदाच मिळाली. सलामीला शेन वाॕटसन ऐवजी सॕम करणला पाठवून धोनीने केलेला बदल बर्यापैकी प्रभावी ठरला. सॕम करणने २ षटकार आणि ३ चौकार ठोकून सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजी सुरुवातीलाच प्रभावहीन करण्याचा एक चांगला प्रयत्न केला. त्यानंतर पहिल्या क्रमांकावर खेळायला आलेला शेन वॉटसन (४२), मधल्या फळीत अंबाती रायडू (४१) स्वतः महेंद्रसिंग धोनी (२१) आणि अखेरच्या काही चेंडूंवर रवींद्र जडेजा (नाबाद २५) यांनी मिळून १६७ धावांचे एक पुरेसे आव्हान सनरायझर्स समोर ठेवले होते.
बुधवारचा सामना
प्ले ऑफ मध्ये स्वतःचे स्थान पक्के करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स पुरेशी गुणसंख्या सध्यातरी जमवून ठेवली आहे. राजस्थान रॉयल्सची परिस्थिती तशी नाही. राजस्थान राॕयल्सला आयपीएलच्या अखेरीस पहिल्या चार मध्ये येण्यासाठी हाराकिरी करुन चालणार नाही. त्यामुळे बुधवारी होणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना राजस्थान रॉयल्सचा जिंकावाच लागेल.