येवला – तालुक्यातील नगरसूलचे माजी उपसरपंच नवनाथ बागल यांना चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेने २०१४ मध्ये बागल यांच्यावर २ लाख १२ हजाराच्या चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. येवला न्यायालयाने बागल यांना शिक्षाही सुनावली होती. या प्रकरणी बागल यांनी निफाड जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात वेळोवेळी सुनावणी होऊन निफाड सत्र न्यायालयाने येवला न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. निकालाच्या वेळी बागल गैरहजर राहिल्याने न्यायालयाने फरार जाहीर करून तालुका पोलिसांवर अटकेची जबाबदारी सोपविली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार एस. पी. घुगे, आर. एन. कांबळे आदींनी शोध घेऊन नगरसूल येथून बागल यांना अटक केली. बागल यांना जिल्हा मध्यवर्ती न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.