मुंबई – चीनने नुकताच असा एक उपग्रह अंतरिक्षात स्थापित केलाय जो संपूर्ण जगावर नजर ठेवू शकेल. हा उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही भागाची छायाचित्रे अगदी जवळून घेऊ शकण्यास समर्थ आहे. याशिवाय नुकतेच चीनने आपले चँग-५ हे यान चंद्रावर पाठवून त्याद्वारे चंद्रावरील मातीचे नमुने गोळा केले आहेत. हे यान आता पृथ्वीवर परत येण्यास सज्ज झाले आहे.
यापूर्वी टेहाळणी उपग्रह गाओफेन-१४ चे प्रक्षेपण शिचांग सेटेलाइट सेंटरवरून केले गेले होते. याला चीनच्या मार्च ३-बी नावाच्या रॉकेटद्वारे अंतरिक्षात प्रक्षेपित केले गेले. गाओफेन हा सर्वाधिक उच्च दर्जाचा उपग्रह मानला जात असून याद्वारे पृथ्वीवरील कोणत्याही भागाची जवळून छायाचित्रे घेऊन भौगोलिक माहिती प्राप्त करणे शक्य आहे.
यानंतर चीनने २४ नोव्हेंबर या दिवशी चँग-५ नावाचे यान चंद्रावर पाठवले होते. या यानाचे नावही चीन च्या चंद्रदेवतेच्या नावावरून ठेवलेले आहे. या यानाचे काम चंद्राच्या पृष्ठभागावरील काही नमुने गोळा करणे हे होते. प्रस्तुत यानाने २ किलो च्या आसपास नमुने गोळा केलेले आहेत. आता हे यान परत येण्यास तयार आहे. चीनच्या ४० वर्षे जुन्या अंतरीक्ष मोहिमेत चंद्रावरून नमुने आणण्यासाठी करण्यात आलेला हा पहिलाच प्रयत्न आहे. यात मनवरहित यान चंद्रावर पाठवून त्याकडून हे काम करवून घेणे अतिशय जिकरीचे काम असल्याचे उपग्रह केंद्राचे उप-निदेशक सांगतात.
जर चीनचे हे यान चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात यशस्वी झाले तर अमेरिका आणि रशिया नंतर चीन असे करणारा तिसरा देश ठरणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अपोलो मिशन द्वारे चंद्रावरील काही नमुने पृथ्वीवर आणले गेले होते. चीनचे नमुने या महिना अखेर मंगोलिया च्या क्षेत्रात उतरण्याची शक्यता आहे. यांच्या अभ्यासानंतर चंद्रा च्या उत्पत्तीबद्दल अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.