वुहान – जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने कोरोना विषाणूची उत्पत्ती कोठे झाली हे शोधण्यासाठी येथील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांना भेट दिली. सदर केंद्र हुबेई प्रांतात आहे. त्यानंतर हे पथक सी फूड मार्केटमध्येही चौकशीसाठी गेले. या पथकाने दौऱ्याचे कोणतेही वेळापत्रक जाहीर केले नाही, मात्र दोन आठवड्यांसाठी ते चीनमध्ये तपासणी करणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची टीम गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये कोरोना साथीच्या प्रादुर्भावाच्या प्रारंभासह इतर मुद्द्यांच्या तपासणीसाठी आली आहे. या टीममध्ये जगातील संक्रामक रोगांशी संबंधित तज्ज्ञ सहभागी आहेत. या पथकाने आपला पूर्वीचा प्राथमिक तपासणी कालावधी संपल्यानंतर फेरतपास सुरू केला आहे. या पथकाने यापूर्वी वुहानमधील रुग्णालयात तपासणी केली जेथे कोरोनाचे सुरुवातीच्या रुग्णांना दाखल करण्यात आले होते.
येथील सी फूड मार्केट मधून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याची वदंता आहे. प्रथम येथे व्हायरस आढळल्यानंतर चिनी सरकारने सर्वप्रथम वुहानमध्ये ७६ दिवसांचे लॉकडाउन लावले होते. त्यासंदर्भात पथकाने मार्केटमध्ये तपासणी केली.