भावेश ब्राह्मणकर
नवी दिल्ली – भारतावर आणखी दबाव वाढविण्यासाठी चीनने भारतीय सीमेलगत थेट अण्वस्त्रांची सज्जता केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काश्गर या हवाई तळावर चीनने ही तयारी केली असून तेथे अण्वस्त्रधारी लढाऊ विमानेही तैनात करण्यात आली आहेत. याचा मोठा परिणाम भारत आणि चीन यांच्यातील (यापूर्वीच बिघडलेल्या) संबंधांवर होणार आहे.
लडाखमधील गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवरुन (एलएसी) गेल्या महिन्यापासून भारत आणि चीन यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. वादाचे पर्यवसन क्रूर हल्ल्यात झाले आणि त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. चीनी सैनिकही ठार झाले असले तरी चीनने त्याबाबत वाच्यता केलेली नाही. सीमा वाद मिटविण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काही ठिकाणावरुन चीनने सैन्य मागे घेतले असले तरी अद्याप हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. अशातच चीनने आता थेट अण्वस्त्रांची तयारी केल्याची बाब पुढे येत आहे.
चीनचे माजी लष्करी अधिकारी यांग चेंगजून यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा चीनने सज्ज केली आहे. अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राला ओळखणे आणि त्याला प्रत्युत्तर देणारी अण्विक यंत्रणा चीनने पूर्णपणे तयार केली आहे. भारत किंवा अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर केला तर काही क्षणातच चीनकडून त्यास उत्तर दिले जाणार आहे, असे चेंगजून यांनी नमूद केले आहे.
ख्यातनाम स्तंभलेखक आणि सेवानिवृत्त कर्नल विनायक भट यांनी ‘इंडिया टुडे’त प्रसिद्ध केलेल्या संशोधन लेखात म्हटले आहे की, काराकोरम खिंडीपासून ४७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काश्गन हवाई तळावर चीनने अण्वस्त्रे आणून तळघरात ठेवली आहेत. लडाखमधील पेंगाँग सरोवराच्याठिकाणी असलेल्या फिंगर ४ पासून ६९० तर जगातील सर्वात उंच धावपट्टी असलेल्या दौलत बेग ओल्डी पासून ४९० किलोमीटर अंतरावर हे हवाई तळ आहे. उपग्रह आणि गुगल अर्थच्या सहाय्याने चीनची ही सज्जता स्पष्ट होत असल्याचे लेखात म्हटले आहे. या हवाई तळावर अणवस्त्रे वाहून नेणारी सहा लढाऊ विमाने (एच ६) सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. आठ मीटर खोली असलेले बंकर तसेच तळघर येथे असून तेथे चीनने मोठी तयारी केली आहे. या हवाई तळाच्या गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर आणि सद्यस्थितीच्या उपग्रह छायाचित्रांमधून चीनची रणनीती स्पष्ट होत आहे.
पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही (नो फर्स्ट यूज) असे चीनचे अण्विक धोरण असले तरी चीन आता त्यावर ठाम राहिल की नाही, याबाबत अनेक तज्ज्ञांना साशंकता आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणे किंवा दोन्ही देशातील सीमा क्षेत्रात निर्मनुष्य असलेल्या बफर झोन मध्ये आक्रमकपणे सैन्य तैनात करणे तसेच या भागात बांधकाम करण्याचा प्रकार हा चीनची पूर्वनियोजित खेळी असल्याचे मत वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भारतानेही सीमा क्षेत्रात सैन्य तसेच शस्त्रास्त्रांची सज्जता केली आहे. मात्र, चीनने आता थेट अण्वस्त्रे तैनात केल्याने त्याचा परिणाम दोन्ही देशातील संबंधांवर होणार आहे. खास म्हणजे, एकीकडे लष्करी बोलणी करायची आणि दुसरीकडे सीमा क्षेत्रात लष्करी आणि सर्वच पातळीवर मोठी सज्जता करायची ही चीनी खेळी उघड होत आहे.
दरम्यान, चीनच्या अण्वस्त्र तयारीची दखल घेऊन भारताकडूनही जशास तसे उत्तर देण्यासाठी तयारी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध पूर्ववत होण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी नसल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केले आहे.