इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ते गृह विलगीकरणात असल्याची माहिती पंतप्रधानांचे विशेष सहायक डॉ. फैसल सुलतान यांनी ट्विट करून दिली. विशेष म्हणजे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी चीनच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. त्या दरम्यान त्यांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान लवकरच कोरोना संसर्गातून बरे होतील, अशा शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून सांगितले, की पंतप्रधान इमरान खान यांना लसीचा डोस देण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांनी देशातील नागरिकांना महामारीच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या. त्यापूर्वी पाकिस्तानमध्ये सर्वाधिक संसर्ग झालेल्या भागात लॉकडाउन लावण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानात सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे.
शनिवारी या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या
पाकिस्तानमध्ये शनिवारी या वर्षी एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान ३,८७६ नवे रुग्ण आढळले असून, ४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात पॉझिटिव्हिटीचा दर ९.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत एकूण ६ लाख २३ हजार १३५ नवे रुग्ण आढळले असून, १३ हजार ७९९ लोकांचा मृत्यू झालेला आहे. ५ लाख ७९ हजार ७६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. २,१२२ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
सिंध प्रांतात सर्वाधिक रुग्ण
सिंध प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक २,६२,७९६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पंजाब प्रांतात १,९५,०८७ रुग्ण, खैबर-पख्तून्वा भागात ७८,६५३ रुग्ण, इस्लामाबादमध्ये ५०,८४३ रुग्ण, बलुचिस्तानमध्ये १९,३०६ रुग्ण, गुलाम काश्मीरमध्ये ११,४३८ रुग्ण आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ४,९६७ रुग्ण आढळले आहेत. इस्लामाबादमध्ये शुक्रवारी ७४७ नवे रुग्ण आढळले असून, एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे ट्विट इस्लामाबादच्या उपआयुक्त हमजा शफकत यांनी केले आहे.