चीनचे हात दाखवून अवलक्षण
– दिवाकर देशपांडे (ज्येष्ठ पत्रकार व सामरिकशास्त्र तज्ज्ञ)
सत्तरीच्या दशकात अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाली होती, तशी स्थिती सध्या नेपाळमध्ये निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात दोन सोविएत रशियावादी कम्युनिस्ट पक्षांत सत्तेसाठी लाथाळ्या सुरू झाल्या होत्या. त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे सोविएत रशियाचे प्रयत्न विफल झाले तेव्हा रशियाने अफगाणिस्तानात रणगाडे घुसवून तेथील कम्युस्टी सत्ताधीशाला ठार केले व आपले प्यादे असलेल्या बबरक करमाल याला अफगाणिस्तानात सत्तेवर बसवले होते.
सोविएत रशियाला अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात आपल्याला अनुकूल सत्ता हवी होती व ती त्यांनी अशा प्रकारे मिळवली. नेपाळमध्ये चीन असे काही करण्याची शक्यता आहे का, याचा विचार होणे आवश्यक आहे. सध्या हिमालयात नेपाळ आणि भुतान या दोन्ही देशांना आपल्या कह्यात घेण्याचा चीनचा प्रयत्न चालू आहे. उद्या नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारशी संरक्षणाचा करार करून चीनने नेपाळमध्ये आपल्या फौजा आणून ठेवल्यातर भारत काय करू शकतो…? तसे झाल्यास नेपाळची स्थिती तिबेटपेक्षा वेगळी राहणार नाही.
नेपाळमध्ये गेल्या काही वर्षात भारताचा राजकीय प्रभाव जवळजवळ संपला आहे. चीनने बरीच लाचबाजी करून नेपाळमधील सर्वच पक्षांत आपली माणसे पेरली आहेत. अशीच लाचबाजी त्याने श्रीलंकेतही चालवली आहे. भारताभोवतीच्या सर्व देशांत विविध कारणांनी भरपूर पैसा पेरायचा व आपला प्रभाव वाढवायचा ही चीनची रणनीती आहे. भारत त्याला पुरा पडणारा नाही. श्रीलंकेने तर भारताला स्पष्टच सांगितले आहे, चीनपेक्षा अधिक पैसा तुम्ही द्या आम्ही तुमचे ऐकू. पण अशी लाचबाजीची नीती भारताला परवडणारी नाही. त्यामुळे भारताला चीनला रोखणारी लष्करी शक्ती मिळवणे आवश्यक आहे. हिमालयातून चीनला हुसकावून लावणे हे आता भारताचे ध्येय असले पाहिजे अन्यथा येत्या काळात नेपाळ आणि भुतान चीनच्या घशात गेलेले असतील.
नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी अचानक पलटी मारून चीनला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यामुळे चीनची पंचाईत झाली आहे. नेपाळमध्ये ओली यांच्यावर दबाव टाकण्यासाठी चीनचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ रविवारपासून तेथे मुक्कामाला आहे, पण ओली त्याना दाद देत नाहीत. पुष्पकमल दहाल ऊर्फ प्रचंड यांचाही आता चीनवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी आता भारत व युरोपीयन देशांकडे देशातला पेचप्रसंग सोडविण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.
चीनचे शिष्टमंडळ देशात असताना प्रचंड यानी ही मागणी करावी हे आश्चर्यकारक आहे. या मागणीचा अर्थ असा आहे की, नेपाळ कम्युस्टी पक्षाच्या दोनी गटांनी आपले म्हणणे ऐकले नाही तर तेथे बळाचा वापर करण्याची धमकी चिनी शिष्टमंडळाने दिली असावी. त्यामुळे येत्या काळात नेपाळमध्ये चीनचे लष्कर घुसले तर आश्चर्य वाटू नये… भारताला सावध रहाण्याची गरज आहे. चीनला हिमालयातील आपली सीमा हिमालयात कुठपर्यंत वाढवायची आहे, हे सोबतच्या नकाशात दाखवलेल्या लाल ठळक रेषेवरून स्पष्ट व्हावे.