नवी दिल्ली – भारताच्या सीमेवर संरक्षण व वाहतूकीच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच देशातील सर्वात लांब रस्ता पूल बांधणार आहे. ब्रह्मपुत्र नदीवरील आसाम-मेघालयाला जोडणाऱ्या या पूलाची लांबी १८ किलोमीटरहून अधिक असणार आहे. त्यामुळे चीनचे टेन्शन आणखी वाढणार आहे.
डोंगराळ व दुर्गम भागातून चीन आणि बांगलादेश सीमेवर जाण्यासाठी हा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे हा पुल सामरिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून सैन्याची वाहने, रसद व व्यावसायिक वाहनांची रहदारी वेगवान होईल. त्याच वेळी, ईशान्य राज्यांमध्ये आर्थिक विकासाला गती मिळेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या आठवड्यात एका पायाभूत सुविधा कंपनीला आसाममधील धुबरी ते मेघालयातील फुलवारी पर्यंत हा रस्ता पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. नवीन वर्षात पुलाचे बांधकाम सुरू होईल आणि २०२६-२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च येईल. या पुलाच्या बांधकामामुळे आसाम, मेघालय, त्रिपुरा, बराक व्हॅली इत्यादींचा परिसर विकसित होईल. सध्या फेरी सर्व्हिस (बोट) द्वारे ब्रह्मपुत्र नदी ओलांडण्यास अडीच तास लागतात, तसेच पावसाळ्यात ही सेवा ठप्प पडते.