लेह – पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्याने पुन्हा घुसखोरी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर ७५ दिवसांनी पुन्हा तणाव निर्माण झाला. पॅन्गोंग त्सो तलावाच्या ठिकाणी सीमेवरील भूभागावर कब्जा करण्यासाठी चीनी सैनिक पुढे आले होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना पटाळून लावले. दोन्ही देशात लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्याने सीमेवर तणाव कायम आहे. तसेच, आगामी काळात लक्षणीय घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री, चीनच्या पीएलए सैनिकांनी, पूर्व लडाख मधल्या संघर्षाबाबत लष्करी आणि राजनैतिक चर्चे दरम्यान याआधी झालेल्या सहमतीचा भंग केला. जैसे थे परिस्थितीत बदल घडवणाऱ्या चिथावणीखोर लष्करी हालचाली केल्या. पॅन्गोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या पीएलएच्या या हालचालींना भारतीय सैन्याने प्रतिबंध करत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली. जमिनीवरच्या तथ्यात बदल घडवण्याचा चीनचा हेतू विफल ठरवला. चुशूल इथे या मुद्याबाबत ब्रिगेड कमांडर स्तरावर फ्लेग बैठक सुरु आहे. चर्चेद्वारे शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कर कटीबद्ध आहे. त्याचबरोबर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठीही तितकेच ठाम आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.









