नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सद्वारे चीनने भारताला धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणहीती स्पर्धा करायची असल्यास १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील काळात आणखी गतिमान घडामोडी दोन्ही देशांमध्ये घडण्याची चिन्हे आहेत. चीनी सैनिकांनी दोन दिवसांपूर्वी पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराच्या परिसरात पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तो भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. त्या पार्श्वभूमीवर तणाव आणखी वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर बोलणी सुरू असताना चीनी सैन्याने पुन्हा घुसखोरी केल्याने चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
वरिष्ठ पातळीवर बैठका
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण दलाचे अधिकारी यांची वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. चीनच्या या कारवायांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे तसेच सद्यस्थिती काय आहे, याबाबत त्यात चर्चा करण्यात आली. तसेच, राजकीय आणि लष्करी पातळीवर हा मुद्दा कसा हाताळायचा याविषयी या बैठकीत निर्णय घेतले जात आहेत. भारतीय भूमीचे संरक्षण करण्यास आम्ही सज्ज आहोत. कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम भारताच्यावतीने देण्यात आला आहे.