नाशिक – पत्नीच्या पहिल्या पती पासून झालेल्या मुलांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण करून सहा वर्षीय चिमुकल्याची हत्या केल्या प्रकरणी सावत्र बापास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
साहिल उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चतुर्वेदी (रा.खंडोबा चाळ, पंचशीलनगर, एन.डी.पटेल रोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत नकूल या सहा वर्षीय मुलाचा मृत्यु झाला होता तर नंदिनी (१०) ही मुलगी जखमी झाली होती. याप्रकरणी एस्तेर सतिष दलाल (रा.मिशनमळा, शरणपूर) यांनी तक्रार दाखल केली होती.
पहिल्या पतीपासून झालेल्या दोन मुलांसह संत आंद्रीया चर्च परिसरात भाडेतत्वावर राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेशी आरोपीचे प्रेमसंबध होते. लव्ह अॅण्ड रिलेशनशिप नुसार राहणाºया दांम्पत्याने २५ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री किरकोळ कारणातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोघा मुलांना कपडे धुण्याच्या धोपटणीने बेदम मारहाण केली. त्यामुळे नकूल आणि नंदिनीस हे बहिण भाऊ रात्रभर विव्हळत पडलेले होते. सकाळी ही बाब शेजाºयांच्या निदर्शनास आल्याने दोघांना तात्काळ जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच नकूल यास वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन वरिष्ठ अधिकारी अशोक भगत यांनी आरोपी चतुर्वेदी याच्यासह त्याच्या प्रियशीस बेड्या ठोकल्या होत्या. या घटनेत सबळ पुरावे गोळा करून पोलीसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. सरकारतर्फे अॅड.वाय.डी.कापसे यांनी काम पाहिले.
हवालदार यु.एस.गोसावी यांनी गुन्हा सिध्द होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून चतुर्वेदी यास जन्मठेप आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
………….
विषारी औषध सेवन करुन तरुणाची आत्महत्या
नाशिक – ओझरखेड ता.दिंडोरी येथील ३० वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मुरलीधर पांडूरंग दिवे असे मृत तरूणाचे नाव आहे. मुरलीधर दिवे यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास आपल्या शेतात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच मावशी संगिता भोये यांनी कोचरगाव शासकिय रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.