नाशिक – भविष्य निर्वाह निधी मिळण्यास विलंब होत असल्याने एका संतप्त कंपनी कामगाराने जिल्हाधिकारी कार्यालयातच पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कारखान्यातील अपघातामुळे अपंगत्व आल्याने या कामगारास नोकरीस मुकावे लागले असून, त्यात हक्काच्या पीएफची रक्कम मिळत नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उपस्थित पोलीसांनी प्रसंगावधान राखत वेळीच धाव घेत त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज जानकीदास बैरागी (३२, रा. सातपूर कॉलनी) असे संशयित कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बैरागी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरीस होता. काही महिन्यांपूर्वी कंपनीतील अपघातामुळे त्यास आपल्या उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला आहे. या घटनेमुळे त्यास नोकरी सोडावी लागली असून, कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे आपल्या जमा पुंजीची मागणी केली आहे.
वेळोवेळी कार्यालयात जावूनही पी.एफची रक्कम मिळत नसल्याने अखेर बुधवारी (दि.२१) सायंकाळी त्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची भेट घेत त्याने पीएफ कार्यालयाकडून होणाऱ्या जाचाबाबत आपबिती कथन केली. यावेळी डोईफोडे यांनी पीएफ कार्यालयाशी संपर्क साधून त्याच्याशी चर्चा करीत असतांनाच बैरागी याने खिशातील प्लास्टिक बाटली काढून पेट्रोल सदृष्य द्रव पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यास थांबविले.
या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली. येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकज बैरागी यास अटक केली असून, न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी अधिक माहितीसाठी डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.