दिंडोरी – तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या दोन दिवसात चार बिबटे जेरबंद झाले आहेत. यातील दोन बिबटे हे दीड वर्षाचे आहेत. मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मोहाडी व परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून त्यांनी काही दिवसांपूर्वी कुत्र्यांना भक्ष्य केले होते. त्यानंतर येथील नागरिकांनी वनविभागास पिंजरा लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार वन विभागाने सोमवारी पिंजरा लावला होता. त्यानंतर गुरुवारी दीड वर्षाचा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा तीन वर्षाचा एक बिबट्या त्याच पिंजऱ्यात अडकला. दोन्ही बिबट्यांच्या संशयावरून वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता शनिवारी पहाटे त्या पिंजऱ्यात दीड वर्षांचे दोन बिबटे जेरबंबटे झाले. त्यांना वन विभागाने ताब्यात घेत नाशिकला रवानगी केली आहे. या परिसरात अजूनही बिबटे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्याची मादी पकडण्यासाठी वनविभागाने व्यूहरचना आखली असून पुन्हा एक पिंजरा त्याठिकाणी लावण्यात आला आहे. तर दोन्ही बिबटे ज्या पिंजऱ्यात अडकले तो पिंजरा पुन्हा त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगुर्डे, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक गोरख गांगुर्डे, उस्मान सय्यद, अनिल दळवी, उत्तम बागुल, माया म्हस्के, सुरेखा खजे, रेखा चौधरी, श्रावण कामडी, अण्णा टेकमाळ लक्ष ठेऊन आहे. पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी परिसरात भेट देत नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकरी राजेंद्र तिडके, रामकृष्ण मौले, संतोष तिडके, किरण खोडे, वैभव भार्गवे, दत्तात्रेय खोडे, विलास पाटील आदींनी केली आहे.