नवी दिल्ली – जगभरातील देशांमध्ये कोरोना महामारीचा वेगाने फैलाव होत असून, जवळपास २२ देशांमध्ये तिसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात लसीकरण वेगाने केले जात असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक पातळीवर पसरत आहे.
गेल्या महिन्याभरात भारतातच कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. देशात परिस्थिती गंभीर होत असून, आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत आहे. ही लाट नसून, त्सुनामीच असल्याचे सांगितले जात आहे. जगातील २२ देशांत कोरोनाची तिसरी लाट असून त्यामध्ये ब्राझील, फ्रांस, युक्रेन आणि रशियाचा समावेश आहे.
जगभरात कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत १० कोटी ७२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २ कोटी २८ लाख जणांवर उपचार सुरू आहेत.
उपाचार सुरू असणाऱ्या २ कोटी २७ लाख रुग्णांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणाच लक्षणे दिसून येत आहे. एकूण उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी ९९ हजार ५०० हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरत आहे. या लाटेत कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढले असून मृत्यूसुद्धा याच कालावधीत अधिक झाल्याचे बोलले जात आहे.
ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार रुग्ण आढळून आले होते. तर दुसर्या लाटेत ९७ हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. आता ब्राझीलमध्ये तिसरी लाट आली असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेत पहिल्या लाटेत एका दिवसात ८० हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. दुसर्या लाटेत यामध्ये एक हजार पटीने वाढ होऊन एका दिवसात अमेरिकेत तब्बल ३ लाख ८० हजारांहून अधिक आढळले आहेत.
जपानमध्ये आगामी काळात ऑलिम्पिक स्पर्धा होणार असून, वाढत्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आगामी काळात जापानमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता आहे.
युरोपमध्ये ५१ देशात आतापर्यंत ११ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ५५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यात मृतांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे.