मुंबई ः राज्यात अनलॉकची प्रक्रिया वेगानं सुरू असली तरी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर वाढत आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने योग्य ती दक्षता बाळगण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्समधील तज्ज्ञांची बैठक झाली. अमरावती, अकोला, नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये सहवासितांचा शोध, निदान आणि चाचणी करण्यात येत आहे, असं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं. कोरोनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि समुपदेशन करण्यात येत आहे. नागपूर, नाशिक आणि सातारा इथं रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी वर्षभर मास्कचा वापर करून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
लसीकरणाचा दुसरा टप्पा उद्यापासून
देशात दिल्ली, गुजरात, तामिळनाडूसह विविध राज्यात कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास शनिवारी सुरुवात झाली. परंतु महाराष्ट्रात १५ फेब्रुवारीपासून दुसरा डोस देण्याचा टप्पा सुरू होणार आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला होता. शुक्रवारपर्यंत देशात ७९ लाख ६७ हजार ६४७ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.