नवी दिल्ली – कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. ही बाब पेन्शनची रक्कम काढण्यावरुनच स्पष्ट होत आहे. गेल्या १७५ दिवसात प्राप्त झालेल्या कोविड क्लेम अंतर्गत २४ तासांच्या आत सुमारे ७५० कोटी रुपये वितरीत केले आहेत. म्हणजेच, ज्यांची नोकरी गेली त्यांनीच पेन्शनचे पैसे परत घेतले आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने कोरोना महामारीच्या काळात भागधारकांची काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. खातेदारांच्या गरजा लक्षात घेऊन ईपीएफओने तातडीने अद्ययावत प्रणाली राबवत पेन्शन धारकांना सुविधा उपलब्ध करून दिली. ईपीएफओने १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ४४ लाखांहून अधिक कोविड अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत ११ हजार ५०० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. कामगार व रोजगार राज्यमंत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे.
२४ तासांच्या आत जास्तीत जास्त पेन्शन धारकांना रक्कम देण्यात आली असून ग्राहकांनी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. कोरोना काळात काम करणे कठीण असूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांसाठी सुविधा सुरु ठेवली. कोरोना क्लेम अंतर्गत येणारी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ईपीएफओने अलीकडेच खातेदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. याद्वारे ही खातेदारांच्या तक्रारीचे तत्काळ निराकरण केले जाणार आहे. ही सुविधा ईपीएफओ – ईपीएफआयजीएमएस पोर्टलद्वारे राबवली जात आहे. तसेच दिवाळीच्या आधी ८.५ टक्के व्याजाचा पहिला हप्ता ६ कोटी सभासदांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येणार आहे. पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के आणि दुसर्या हप्त्यात ०.३५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाने याची घोषणा केली आहे.