नाशिक – शेतकरी फसवणुकीबाबत परिक्षेत्रात ११९२ तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या. यामध्ये फसवणूक झालेली रक्कम ४६ कोटी २० लाख रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी १९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून २०० प्रकरणात आपआपसात तडजोड झाली. १९९ व्यापा-यांनी शेतक-यांना पावणे सहा कोटीहून अधिकची रक्कम परत केली आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
डॉ. दिघावकर म्हणाले की, पाच कोटी ८४ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम व्यापारी शेतक-यांना परत करण्यास तयार झाले आहे. या माध्यमातून १२ कोटी ६० लाखहून अधिकची रक्कम शेतक-यांना मिळणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीबाबत परिक्षेत्रात ३९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त अर्जात फसवणुकीची रक्कम दोन कोटी ३८ लाखाहून अधिक आहे. या प्रकरणी ३० गुन्हे दाखल करण्यात आले. दोन प्रकरणात आपसात तडजोड झाली. सुशिक्षित बेरोजगारांना आतापर्यंत ३७ लाख ३८ हजाराची रक्कम परत मिळाली. तर १५ लाख ५७ हजाराची रक्कम बेरोजगारांना परत करण्यास संशयित व्यक्ती तयार आहेत, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले.
गुटख्याचे गुन्हेगार थेट तडीपार
चार महिन्यात परिक्षेत्रात गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री प्रकरणी ६२ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी ८३ संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत नऊ वाहनांसह तीन कोटी ४८ लाखाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांवर तडिपारीची कारवाई केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि धुळे (महाराष्ट्र) सीमेवर गांजाची शेती केली जात असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले आहे. परिक्षेत्रात चार महिन्यात ३३ जणांविरुध्द २३ गुन्हे दाखल करण्यात आले. त्या अंतर्गत ५२० किलोहून अधिक गांजा, २७१ गांजाची झाडे, ओलसर पाने आणि मोटारसायकल असा ६८ लाखहून अधिकचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये एकटया धुळे जिल्ह्याातील ४५ लाखाहून अधिकच्या मालाचा समावेश आहे, असे डॉ. दिघावकर यांनी सांगितले आहे.