देहाराडून: उत्तराखंडमधील चामोलीतील तपोवन येथील विष्णुगड प्रकल्प दुर्घटनेमध्ये मुख्य बोगद्यात आणखी तीन मृतदेह आढळले असून आतापर्यंत याच जागेवर आठ मृतदेह सापडले आहेत. या बोगद्यात ७ फेब्रुवारी रोजी बेपता झालेल्या ३४ जणांचा ९ दिवसांनंतरही शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरूच आहे. तसेच सोमवारी मैथाना भागात एक आणि अलकनंदा हायड्रो प्रकल्प बॅरेजमधून एक मृतदेह सापडला.
या दुर्घटनेत हरवलेल्या व्यक्तींपैकी आतापर्यंत ५६ मृतदेह सापडले आहेत. इतर १४८ जणांचा शोध सुरू आहे. तसेच आपत्ती बाधित १३ खेड्यांमध्ये जनजीवन सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे येथे वाहतुकीची साधने तयार केली जात आहेत. ऋषीगंगा जलग्रहण क्षेत्रात उद्ध्वस्त झालेल्या घटनांमध्ये बेपत्ता झालेल्यांचा बचाव दल शोध घेत आहेत.
गेल्या आठवड्याभरात बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अनेक पर्यायावर काम केले गेले, परंतु बोगद्यात पुरेशी हवा नसल्याने जागेचा अंदाजही घेता येत नव्हता. आता मुख्य बोगद्यातून मलबा काढण्यात अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाच्या बंधाऱ्यातून मलबा हटविण्याचे काम नवव्या दिवशीही सुरू होऊ शकले नाही. सध्या धौलीगंगा नदीतील गळती रोखण्यासाठी नदीचा प्रवाह दुसर्या दिशेने वळविला गेला आहे. चामोली जिल्हा दंडाधिकारी स्वाती एस भदौरिया म्हणाल्या की, बॅरेजमधील दलदलीमुळे साफसफाई सुरू होण्यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे. परंतु बोगद्यात अडकलेल्या व्यक्ती अजूनही जिवंत राहण्याची अपेक्षा आहे असा त्यांनी विश्वास आहे. त्यामुळे तपोवनमध्ये २४ तास रुग्णवाहिका, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातही संशोधन ऋषीगंगा हायड्रो प्रकल्प व त्याच्या आसपासच्या बंधाऱ्यासह श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि हरिद्वार येथे बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. ऊर्जा कॉर्पोरेशनने तात्पुरती विद्युतलाईन तयार करून वीजपुरवठा पूर्ववत केला असून सध्या चमोली जिल्ह्यातील १३ गावे या आपत्तीमुळे बाधित आहेत.