नाशिक : चांदशी शिवारातील हॉटेलमध्ये चालणारा बेकायदा हुक्का पार्लर अड्डा ग्रामिण पोलीसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत हॉटेल मालक,व्यवस्थापकासह तीन वेटर आणि २३ ग्राहकांविरूध्द कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चांदशी शिवारातील हॉटेल सेक मध्ये राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.५) रात्री अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असता तेथे २३ ग्राहक तंबाखूजन्य पदार्थ सेवन करतांना मिळून आले. संबधीतांना हॉटेल व्यवस्थापनाकडून हुक्का ओढण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा केला जात होता. याप्रकरणी हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्यासह तीन वेटर आणि २३ ग्राहकांविरूध्द तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून हुक्का ओढण्याचे साहित्य तसेच तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने बेकायदा हुक्का पार्लरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.