चांदवड – चांदवड तहसिल कार्यालया तर्फे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिमय १९६६ चे कलम १५५ चे तरतुदी नुसार मूळ हस्तलिखीत सातबारा प्रमाणे संगणीकृत सातबारा करतांना त्यात झालेल्या हस्तदोष चुका दुरूस्तीसाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ ते संध्या ६ वाजेपर्यंत चांदवड तहसिल कार्यालयात महाराजस्व अभियाना अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
महसूल दप्तरी सातबारा संगणीकरणाची मोहिम सुरु आहे . सातबारा संगणीकीकृत करतांना कामकाजाच्या ओघात काही हस्तदोष झाल्याचे दिसून आले असून त्या दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांना तहसिल कार्यालय चांदवड आणि तालुक्यातील तलाठी कार्यालयामध्ये पाठपुरावा करावा लागत आहे . दरम्यान याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीही जनतेच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सुचित केलेले होते . त्यानुसार चांदवड तहसिल कार्यालयाने या विशेष शिबिराचे खास जनतेच्या सोईसाठी आयोजन केले आहे . या शिबीरास चांदवड शहर तसेच तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत . नागरिकांनी त्यांच्या मिळकतीच्या सातबारा मध्ये झालेल्या हस्तदोषांच्या बाबतीत त्यांच्याकडील कागदोपत्री पुराव्यांसह ( मूळ हस्त लिखित सातबारा , फेरफार नोंद , हस्त दोष असलेला संगणीकृत सातबारा ) अर्ज करावा व या शिबिरास हजर रहावे यावेळी तात्काळ निर्णय घेवून हस्तदोषांचा निपटारा करून जनतेच्या अडचणी दुर केल्या जाणार आहेत . त्यानुसार या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून चांदवड शहर व तालुक्यातील जनतेने त्यांच्याकडील कागदोपत्री पुराव्यांसह या शिबिरास मोठ्या संख्येने हजर राहुन सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार प्रदीप पाटील, नायब तहसिलदार तथा डीबीए अमित पवार यांनी केले आहे .