चांदवड – कोरोना परिस्थितीमुळे सर्वांनीच आपल्या सुरक्षेसाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळा,सॕनिटायझरचा वापर करा, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा आणि सर्वात महत्वाचे घराबाहेर जातांना चेहऱ्यावर मास्क लावा जेणेकरून कोरोना आजाराचा प्रतिबंध करता येईल असे विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयी आवाहन नुकतेच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री नेमीनाथ जैन माध्यमिक विद्यालयातील कला विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन माध्यमातून घरातील कापडापासून हातानेच मास्क तयार करण्याच्या कार्यशाळेत करण्यात आले अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ.एस.आर.बाफना यांनी दिली.
कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे हा एकमेव प्रभावी उपाय वापरण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना पासून वाचवण्यात मास्कची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्याच बरोबर मास्कमुळे आरोग्यदायक फायदे समोर येत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी गर्दीत जाताना तसेच शाळेत येताना मास्क लावावे या हेतूने विद्यालयाच्या कला विभागाचे प्रमुख उपक्रमशील कलाशिक्षक काशिनाथ व्ही.अहिरे यांनी विद्यार्थ्यांना कार्यानुभवाच्या प्रसंगोपात उपक्रमातून टाकावुतुन टिकाऊ वस्तू बनवु या संकल्पनेतुन घरी असलेल्या जुन्या कापडापासुन हातानेच व शिलाई मशिनचा वापर न करता मास्क तयार करण्याचे मार्गदर्शन आॕनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना केले. यातुन विद्यार्थ्यांनी शिवणकलेचा आनंद घेवुन स्वतः मास्क शिवतांना कापडाचे शिवणकाम,घडीकाम, कातरकाम, इत्यादी स्वानुभव घेतले. स्वतःसाठी,कुटुंबासाठी तसेच इतरांसाठी मास्क बनवू, मास्क वापरु सुरक्षित राहू असे या मार्गदर्शनातुन सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आॕनलाईन माध्यमातून मास्क बनविण्याची कृती पाहुन मास्क बनवुन विद्यालयाच्या कला व उपक्रम गृपवर फोटो पाठवुन उपक्रम यशस्वी केला.
विद्यालयाच्या कला विभागाच्या या उपक्रमशीलते बद्दल श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती,प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितभाऊ सुराणा,सचिव जवाहर आबड,समन्वयक शांतीलाल अलिझाड, वर्धमान लुंकड, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी पी.पी.गाळणकर, प्राचार्य डॉ.सौ.एस.आर.बाफणा, उपमुख्याध्यापक एस.यु.समदडीया, विभाग प्रमुख सी.डी.निकुंभ, पर्यवेक्षक एम.टी.सोनी आदी सर्वांनी कौतुक केले.