कीर्ती गुजराथी, चांदवड
चांदवड – एमएचआरडी, भारत सरकार व ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२०’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तीन दिवस चाललेल्या राष्ट्रीय स्पर्धेत येथील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील “ऍग्रो अभियंता’ या विद्यार्थ्यांच्या संघाने बनविलेल्या “स्मार्ट शुगरकेन प्लांटर’ने हार्डवेअर ऑडिशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे रोख पारितोषीक पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव कोकाटे यांनी दिली. या यशाबद्दल चांदवड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी सांगितले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१० हा देशभरातील नामी संस्थानांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात दहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. तर ३०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांचा व कौशल्यांचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित केले होते, जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल. चांदवड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ए.आई.सी.टी.ई च्या ऍग्री व रूरल डेव्हलपमेंट या क्षेत्रातील “स्टुडंट इनोवेशन आयसी४८१’ या भागात सहभाग नोंदविला होता. यासाठी देशभरातून केवळ तीन प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी दोन प्रकल्प हे चांदवड महाविद्यालयातील होते.
“ऍग्रो अभियंता’च्या संघाने बनविलेल्या “स्मार्ट शुगरकेन प्लांटर’द्वारे सरी पाडणे, खत पसरविणे, माती बुजवणे व ऊस लागवड करणे यांसारखी कामे केली जातात. यंत्रातील एनपीके सेन्सरच्या मदतीने शेतकरी शेतीतील मूलद्रव्य व अन्नघटकांची चाचणीही करू शकतात व त्याआधारे दिल्या जाणाऱ्या खतांची, औषधांची मात्रा ठरू शकतात. यामुळे जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होते. संपूर्णत: स्वयंचलित यंत्र असल्याने दहा ते बारा मजुरांचे कामे यंत्राद्वारे केली जाऊ शकतात. त्यामुळे हेक्टरी येणारा दहा ते बारा हजारांचा खर्च कमी होऊन अवघ्या तीन ते चार हजारांवर येतो. यंत्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना ५५ हजार रुपये इतका खर्च आलेला आहे. हा प्लांटर ट्रॅक्टरला जोडून चालविला जातो.
प्रकल्पप्रमुख अंजली कोतवाल, नीलेश लगड, नंदकिशोर भवर, सतीश गांगुर्डे, निखिल खापरे व पायल नवले या विद्यार्थ्यांच्या संघाला प्रा. व्ही. सी. जाधव यांचे मार्गदर्शन व यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती, महाविद्यालय समन्वयक प्रा. एस. बी. आंबोरे व प्रकल्प समन्वयक प्रा. आर. एस. चौधरी यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, समन्वयक झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती आदीनी अभिनंदन केले.