चांदवड – तालुक्यात मोठया प्रमाणात उत्पादित झालेले मका पीक सध्या शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा खूप कमी किमतीने बाजारात खरेदी केले जात आहे. चांदवड तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय होत असून त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोरोना लॅाकडाऊनच्या काळात ओढवलेल्या आर्थिक कोंडीमुळे मका उत्पादकांना मका पिकाच्या भावातील ही तफावत अधिकच संताप देणारी ठरली असल्याचे निवेदन ‘ ग्रामसमृद्धी फाऊंडेशन’ च्या चांदवड शाखेच्या वतीने प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले. यात मका पिकाच्या भावाच्या संदर्भातील ही अन्यायकरी समस्या त्वरित दूर व्हावी व शासनाने जाहीर केलेला हमीभाव १८५० रुपये क्विंटल या दराने मका खरेदीसाठी चांदवड तालुक्यात केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ‘ग्रामसमृद्धी फाऊंडेशन’ चे विश्वस्त व ‘महाराष्ट्र सरपंच संसदे’चे नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर,’ग्रामसमृद्धी फाऊंडेशन’ चे चांदवड तालुका समन्वयकविजय जाधव,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काळे,काँग्रेस पक्षाचे चांदवड शहर अध्यक्ष प्रकाश शेळके व अशोक गांगुर्डे यांनी लेखी स्वरूपात हे निवेदन दिले.