चांदवड : चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शालेय पोषण आहारातील पंधरा क्विंटलचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संस्थेने मुख्याध्यापिका जयश्री गोलेचा यांना तात्काळ निलंबीत केले आहे. मुख्याध्यापिकेने चालकाशी संगनमत करून पोषण आहारातील पंधरा क्विंटल तांदूळ शाळेत न आणता परस्पर उतरवून घेतल्याचे संस्थेच्या कार्यकारी मंडळाला समजले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करत असतांनाच पाहणी केली. यावेळी एका विद्यार्थ्याला सहा किलो तांदळाचे वाटप करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एका विद्यार्थ्याला चार ते साडेचार किलोच तांदूळ वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. नेमीनाथ जैन संस्थेची श्री नेमीनाथ जैन प्राथमिक विद्यामंदिर ही अनुदानीत शाळा आहे.
असा घडला प्रकार
पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करणाऱ्या तिरुपती सप्लायर एजन्सीचे वाहन क्रमांक एमएच – १४ एएच – ६९१० च्या चालकाने संस्थेच्या प्राथमिक शाळेत या पोषण आहारातील तांदूळ आणला. त्याने पन्नास किलो वजनाच्या ७१ गोण्या उतरवल्या. वास्तविक नियमानुसार पन्नास किलो वजनाच्या १०१ गोणी तांदूळ शाळेत पुरवठा करायला हवा होता. असे असतांना मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा यांनी सदर चालकाला १०१ गोणी पुरवठा केल्याची पोहोच पावती दिली. ही गोष्ट व्यवस्थापन समितीला समजली व हा प्रकार प्रत्यक्ष पाहणीनंतर उघड झाला.