चांदवड – केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला चांदवड तालुका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने जाहीर पाठींबा देत, केंद्र शासनाच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करुन चांदवड तहसिल कार्यालयासमोर आंदोलने केले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे शासन बळाच्या जोरावर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून अश्रुधूर सोडून, हायवे खड्डे खोदुन शेतकरी नेत्यांना स्थानबध्द करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यात दोन वयोवृध्द शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखों शेतकरी दिल्लीच्या सिमेवर ठिय्या देवुन गेली पाच दिवस बसले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा , शेतकरी विरोधी वीज बिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा प्रमुख मागण्या मान्य करण्याचे म्हटले आहे.
या आंदोलनात हनुमंत गुंजाळ,ऍड दत्तात्रय गांगुर्डे,भास्करराव शिंदे, गणपत गुंजाळ , शब्बीर सैय्यद, रामराव पारधे तुकाराम गायकवाड,लक्ष्मण आहेर,छबु पुरकर,नामदेव पवार, दशरथ कोतवाल,नंदाबाई मीरे,ताईबाई पवार अरूण वाघ आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.