विष्णू थोरे, चांदवड
चांदवड – अविश्वास ठराव मंजूर होण्याअगोदरच उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करुन विरोधकांवर कुरघोडी केली आहे. अवघ्या काही महिन्यानंतर होणा-या पंचवार्षिक निवडणुकीत कासलीवाल यांचे खच्चीकरण करण्याचा हा डाव होता. पण, कासलीवाल यांनी तो विरोधकांवरच उलटवल्याची चर्चा आता राजकीय वर्तूळातून व्यक्त होत आहे.
कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आपण ५९ महिने सर्वांसोबत निष्ठेने काम करूनही आपल्यावर केवळ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उद्देशाने अविश्वास ठराव आणला गेला. त्यामुळे मलाच धक्का बसला आहे. त्यामुळे मी अगोदरच राजीनामा देऊन कृतीचा निषेध करतो. आजपर्यंत मी जनतेची सेवा केली आहे. यापुढेही नगरसेवक या नात्याने प्रामाणिकपणे करीत राहीन. चांदवडच्या जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे भावनिक मत व्यक्त करत त्यांनी आगमी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.
यावेळी कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषदेच्या आजपर्यंत केलेल्या ५ महिन्यांच्या विकासकामांबद्दलची माहिती सांगितली. सुरुवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्ष व नंतरचे अडीच वर्ष उपनगराध्यक्ष पदावर असताना चांदवड नगरपरिषदेला निधी कसा उपलब्ध होईल व शहराचा विकास कसा होईल याकडेच आपण लक्ष केंद्रित केले होते. नाशिक जिल्हात सर्वात जास्त निधी आपण चांदवड नागर परिषदेला मिळवून दिला असून जिल्हात सर्वात जास्त निधी मिळालेली आणि विकासकामे झालेली चांदवड नगर परिषद ही एकमेव नगरपरिषद आहे. आजपर्यंत चांदवड नगरपरिषदेला १५४.२६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यात चांदवड शहराला २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा करणारी ७४ कोटी रुपयाची योजना येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असून शहरात पाण्याचा निचरा होण्यासाठी सांडपाणी नियोजन व भुयारी गटार योजना ही जवळपास ४६ कोटी रुपयांची कामे सुरु असल्याचे सांगत पुढील निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्देही अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. एकुणच कासलीवाल यांच्या या राजीनाम्यामुळे चांदवडचे राजकारण सध्या पेटले आहे….