चांदवड – जनसेवा हि ईश्वर भक्ती या उक्तीप्रमाणे चांदवड एक गाव,चांदवड आणि शिवबा परिवार,मालेगाव या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून “एक दिवाळी वनवासी बांधवांसाठी” हा अभिनव सेवा उपक्रम राबविला गेला.
सटाणा तालुक्यात काही छोटे-छोटे पाडे आहेत. तेथे वनवासी बांधव हलाखीचे जीवन जगतात. या सगळ्या बांधवांना कोरोना संकटात मदत म्हणून दिवाळी साजरी करण्यासाठी चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला या शहर व तालुक्यातील नागरिकांना आपल्याकडील जुने सुस्थितीत असलेले कपडे धुऊन व इस्त्री करून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
एकूण ४३७५ कपडे, ज्यात शर्ट, पॅन्ट, साड्या, पंजाबी ड्रेस, लहान मुलांचे कपडे, स्वेटर, बेडशीट असे जमा झाले. त्याचप्रमाणे दिवाळी फराळ मिळून २२ पोते मुरमुरा चिवडा तयार करण्यात आला. या सर्वांचे वितरण करण्यात आले. त्यात हनुमंत पाडा, भीम पाडा, साळवण, साल्हेर या पाड्यांमध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन स्वयंसेवकांनी कपड्यांचे वितरण केले व आपुलकीचे नाते जपले.
प्रदीप बच्छाव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या सेवा उपक्रमास सढळ हाताने मदत केल्याबद्दल चांदवड एक गाव ग्रुप ने सर्वांचे आभार मानले. उपक्रमात अक्षय गुजराथी, कुणाल अहिरेवाल, आकाश परदेशी, किशन आचार्य, पुष्पक पाठक, सचिन लांबोटे, प्रवीण देवरे, अमित ब्रह्मेचा, समाधान गायकवाड व अन्य सहकऱ्यांनी सहकार्य केले.
पहा या उपक्रमाचा व्हिडिओ