चांदवड- चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत “स्वस्थ सारथी’ चालकांसाठी चांदवड येथील डावखर नगर येथे शनिवारी (दि. ६) सकाळी ११.३० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मागील वर्षभर सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशाही परिस्थितीत अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. वाहन चालकांनी या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या आरोग्याचा धोका पत्करून त्यांनी या काळात सर्वांना सेवा पुरविली. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. भारतीताई पवार यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यातर्फे या कार्यक्रमास एस. हल्दर (एम.डी.), एस. शर्मा (डी.सी.), राजेश पांडे (इंडिपेंडंट डायरेक्टर), दीपक मुकादम ( इंडिपेंडंट डायरेक्टर), अमित गर्ग (नॉमिनी डायरेक्टर) आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. सर्व वाहन चालकांनी या शिबिरास उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी केले आहे.