चांदवड – राज्यातील तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असून, वातावरणात बदल झालेले आहेत तसेच ऊन्हाचा कडाका वाढलेला आहे . या उन्हाळ्याचा त्रास ,फटका सर्वसामान्यांप्रमाणे पशू-पक्ष्यांना आणि प्राण्यांपेक्षा पक्ष्यांना जास्त बसत आहे. यामध्ये मुख्यत्वे उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांसह लहान पक्ष्यांनाही उष्माघाताचा फटका बसत असल्याचे आढळून आलेले आहे
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत असल्याचे आढळून येत आहे. कमी पर्जन्यमानामुळे, दुष्काळामुळे पाणवठे, तलाव, विहिरी तसेच एकूणच शहर व परिसरातील भूजलाची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे वन्यजीव व पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे बनले आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागल्याने ठिकठिकाणी पक्षी जखमी अवस्थेत सापडत आहेत .शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत असतांनाच आता यासाठी सामाजिक संस्था, पक्षी व प्राणिमित्रांनी पुढाकार घेत प्राणिमात्रांवर दया केली पाहिजे आणि याकरिता तरुणाईही सरसावलेले आहे असे ठिकठिकाणी दिसत आहे.
शहरी भागात पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. चांदवडच्या, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद अशोक हांडगे यांनी घरी कृत्रिम पाणवठे तयार केले असून गच्चीवर, बाल्कनीत तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरली आहेत. तसेच खाण्याची सोयही केली आहे.तसेच पक्षीमित्र अमोल हांडगे , दीपक आहेर व नितीन आहेर हे युवक आणि त्यांचा मित्र समूह हा उपक्रम तालुक्यात ठिकठिकाणी राबवित आहेत.
यंदा एप्रिल महिन्यातच शहरात व ग्रामीण भागात साधारणतः दैनंदिन तापमान हे अधिक असल्याची नोंद आहे . या वाढत्या उष्म्याचा परिणाम माणसांबरोबरच वन्यजीव व पक्ष्यांवर होत आहे. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होणे अथवा पाण्याअभावी पक्षी तडफडून मरत आहे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडत आहेत.
पाण्याअभावी पक्षी तडफडून मरत आहेत. सध्या चिमण्या, बुलबुल, कोकीळ ,पारवे, कावळे, यांसारखे पक्षी उष्माघाताचे बळी पडत असल्याचे बहुतेक ठिकाणी आढळून येत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. उष्माघाताचे बळी ठरलेल्या/जखमी झालेल्या पक्ष्यांवर चांदवडच्या श्रीम . जे .आर . गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शालेय समितीचे सदस्य व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद अशोक हांडगे आणि त्यांचा मित्र समूह हे उपचार करीत आहेत. सामाजिक संस्था व पक्षीमित्रांनी वन्यजीव व पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रामुख्याने पुढे येऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच खाद्याचीही सोय करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात वाढत्या उष्म्यामुळे वन्यजीव व पक्ष्यांचे संरक्षण करून त्यांना जीवदान देण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना व व्यक्तींनी पुढाकार घेऊन “जिथे घर ,तिथे पक्षी पाणवठा ” ही संकल्पना राबवणे गरजेचे आहे. यासाठी आपण आवश्यक ते मार्गदर्शन करू असे आवाहन अशोक हांडगे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये !!
शहरातील बहुतेक नागरिक हे साफसफाई करतांना त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्ष्यांची घरटी काढून टाकतात, त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात . त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावे अशी विनंती अशोक हांडगे यांनी नागरिकांना केली आहे
नागरिकांनी पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात या सोयी सुविधा कराव्यात
– घरावर व बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरलेली ठेवावीत . तसेच शक्यतो हि पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत
– शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.
– घरा-इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका
– घराच्या परिसरात गच्चीवर, बाल्कनीत खाण्याची सोयही करावी
– पिण्याचे भांड खोलगट नव्हे तर पसरट असावं.
– पाणी वेळोवेळी बदलत राहावं व भांडंही स्वच्छ ठेवावे कारण सतत भांडयात पाणी राहिल्याने शेवाळाचीही निर्मिती होते आणि पाणी पिण्यास अयोग्य होते
अनेक वर्षांपासून सुरु आहे उपक्रम
अशोक हांडगे ,तसेच पक्षीमित्र अमोल हांडगे , दीपक आहेर व नितीन आहेर हे युवक आणि त्यांचा मित्र समूह हा उपक्रम तालुक्यात ठिकठिकाणी राबवित आहेत हे सुमारे ७ वर्षांपासून पक्षांसाठी पांणी आणि खाद्य यांची व्यवस्था करतात