चांदवड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तांविना सुनासुना साजरा करण्यात आला. दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मध्यरात्री १२ वाजता मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशा साध्या घरगुती पध्दतीने उत्सव साजरा करण्यात आला.
चांदवड शहरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता होळकर ट्रस्ट व प्रशासनाच्या सक्त आदेशानुसार यंदा फक्त मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी अमोल दिक्षित व दीक्षित कुटुंबीयांनी अत्यंत घरगुती स्वरूपात उत्सव साजरा केला. उत्सव काळात श्रीकृष्णाच्या मुर्तीस दररोज राधा, देवर्षी नारद, पांडुरंग, श्रीनाथजी, विठू महार, बालाजी अशा वेगवेगळ्या रुपात सजवण्यात आले. गीता पाठ, विष्णुसहस्रनाम, श्रींच्या मूर्तीस महाभिषेक पूजन, आरती, प्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. मात्र भक्तांचा हिरमोड होऊ नये यासाठी सर्व कार्यक्रम सोशल मीडिया मार्फत भाविकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावर्षी दीक्षित कुटुंबीयांनी केला. उत्सव काळात चांदवड पोलिस स्टेशनचे ए पीआय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. होळकर ट्रस्टचे पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.