चांदवड- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी दिल्ली येथील आंदोलनाला अनुसरुन दडपशाहीच्या विरोधात आज गणुर चौफुली येथे दुपारी साडेबारा वाजता किसान सभेच्या वतीने पाऊन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी केलेल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी काळे कायदे मंजुर करुन घेतले. सदर कायदे हे शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असल्याने शेतकऱ्यांनी त्या कायद्यांना तीव्र स्वरुपात विरोध केला. शेतकऱ्यांनी सरकारला वेळोवेळी ३ ही कृषी कायदे मागे घेण्याची वारंवार विनंती केली . परंतु केंद्र सरकार शेतकऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेतकऱ्यांनी दिल्ली येथे गेल्या ७३ दिवसांपासुन आंदोलन सुरु केलेले आहे . सदर आंदोलने शांततेच्या मार्गाने चालु असतांना केंद्र सरकार आंदोलकांवर अमानुष दडपशाही करीत आहे. आंदोलन मोडुन काढण्याचा प्रयत्न करीत आहे . सरकारने चारही आंदोलन स्थळावर प्रचंड पोलीस दल तैनात केलेले आहे . आंदोलकांचे रसद तोडण्यासाठी पाणी, विज, अन्नपदार्थ याचा पुरवठा बळाचा वापर करुन तोडण्यात आलेला आहे , आंदोलन स्थळा वरील सत्य जगाला कळु नये म्हणुन इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विज बिल विधेयक २०२० मागे घेण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफ़ारसी लागु करण्यात याव्या त्याच बरोबर कॉ.देविदास हाडोळे, इगतपुरी यांचेवरील खोट्या केसेस मागे घेण्यात याव्या यासह विविध मागण्यात करण्यात आल्या. या आंदोलनात अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, हनुमंत गुंजाळ, भास्करराव शिंदे, गणपत गुंजाळ यांनी आपले विचार व्यक्त केले व चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन दिले.