चांदवड- सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चांदवड शहरातील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला असून ८ मार्चपासून चांदवड येथील सोमवारचा आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी तथा चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी दिली.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई केली आहे. रस्त्याच्या कडेला कोणत्याही व्यावसायीकांनी बसू नये व विवाहासाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. याची फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, इतर व्यावसायीक, सर्व मंगल कार्यालय, लॉन्सचालकांनी नोंद घ्यावी तसेच कोरोनापासून बचावासाठी सर्व नागरीकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरीक अंतराचे पालन करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. सूचनांचे पालन न केल्यास संबंधीत व्यक्ती व संस्थांवर दंडात्मक कारवाई करुन कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.