जळगाव – एकाच कुटुंबातील दोन सदस्य मंत्रिमंडळात किंवा राजकारणातील महत्त्वाच्या पदांवर असणे आपल्यासाठी नवे नाही. देशात अनेक वर्षांपासून सुरू असलेली राजकारणातील घराणेशाही आपण बघतोच आहे. मात्र पत्नी महापौर आणि पती विरोधी पक्षनेता असणे जरा दुर्मिळच. अर्थात हे चित्र अप्रत्यक्षपणे प्रत्येक घरात आहेच, मात्र असा योगायोग खऱ्या खुऱ्या राजकारणात आल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
जळगाव महानगरपालिकेत अडीच वर्षांतच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने भगवा फडकवला. एकीकडे देशभर इतर पक्षांचे आमदार–खासदार फोडणाऱ्या भाजपला जळगावात शिवसेनेने खिंडार पाडले आणि भाजपमधील २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर सत्ता स्थापन केली. यात शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या. आता तर भाजपला विरोधी पक्षनेते पदही मिळणे अवघड झाले.
आता महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे एकाच पक्षाकडे आहेत. कारण जयश्री महाजन यांचे पती सुनील महाजन हे आधीपासूनच विरोधी पक्षनेते पदी होते. महापौर बदलला असला तरीही सुनील महाजन यांचे पद कायम आहे. त्यामुळे कदाचित देशाच्याच राजकारणात महापौरपदी पत्नी आणि विरोधी पक्षनेते पदी पती असे चित्र प्रथमच बघायला मिळत आहे.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा जिंकून भाजपने जळगाव महानगरपालिका काबीज केली होती. सेनेला केवळ १५ जागा जिंकता आल्या होत्या. एमआयएमकडे केवळ तीन जागा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद सेनेकडे गेले. सुनील महाजन गेल्या अडीच वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदी आहेत.
महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीआधीच भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने महापालिकेतील भाजपची सत्ता गेली. हे झाले सारे राजकारणाचे. पण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर चुकले तर सर्वांत पहिला विरोध त्यांच्याच पक्षाच्या आणि त्यांच्याच कुटुंबातील विरोधीपक्षनेत्याकडून होईल, हा अनोखा योगायोग यानिमित्ताने बघायला मिळणार आहे.