मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत नक्की काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील प्रश्न तसेच राज्याचा आगामी अर्थसंकल्प यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवार हे सातत्याने शिवसेनेवर टीका करीत असताना आज अचानक त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये १५ ते २० मिनिटे चर्चा झाली आहे. गेल्या सरकारमध्ये मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ खाते होते.
दरम्यान, भेटीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात राजकीय अर्थ काढण्यासारखे नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.