देहराडून – उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या ३४ जणांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली बचाव ऑपरेशन मोहीम सलग तिसर्या दिवशीही सुरू राहिली. दिवसभर बोगद्यातून काही ढिगारा काढल्यानंतर बचाव दल आतापर्यंत बोगद्याच्या आत १८० मीटरपर्यंतच पोहोचू शकले आहे. दरम्यान अद्याप बेपत्ता झालेल्या १७४ जणांचा शोध सुरूच आहे.
उत्तराखंड सीमेवरील रैनी गावाजवळ हिमनग कोसळल्यामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यासाठीची मोहीम तिसर्या दिवशीही कायम राहिली. तपोवन-विष्णुगडच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला मोठी धडपड करावी लागत आहे. या ठिकाणी टी-पॉईंटवर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आता पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे.
सलग तीन दिवस बोगद्यात अडकलेल्यांचा जीव वाचविण्यासाठी बोगद्याच्या बाजुला आणि बोगद्यात ड्रिलिंग करून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या बचाव पथका सहाय्याने अडकलेल्यापर्यंत पोहचवून ऑक्सिजन पुरवण्याची शक्यता शोधून काढली जात आहे. उद्यापर्यंत बचाव दल टी-पॉईंटवर पोहोचण्याची शक्यता आहे.
नेव्ही कमांडो पथक आता ऋषीगंगा, धवलगंगा आणि अलकनंदा येथे हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत गुंतले आहेत. रैनी येथील पूल तोडून भारत-चीन सीमेवर संपर्क तुटलेल्या १३ गावात मदतीचा पुरवठा करण्यात आला असून रस्त्यांअभावी इतर ठिकाणी अडकलेल्या १२६ ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने रैनी गावात नेण्यात आले. निती खोऱ्यात तिसर्या दिवशी वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आल्या. मंगळवारी आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर त्यांची संख्या ३२ वर पोहोचली. त्यातील आठ जणांची ओळख पटली असून त्यामध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता बेपत्ता झालेल्यांची संख्या १७१ वरून १७४ वर गेली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मंगळवारी दुर्घटनाग्रस्त गावात भेट दिली.