कोची / चेन्नई – गेल्या आठवडयात चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर आता पुन्हा केरळ आणि तामिळनाडूमध्ये आणखी एका बुरेवी नावाच्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. कारण बंगालच्या उपसागरात तीव्र दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्याचे रुंपातर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने असा इशारा दिला आहे की, बुरेवी चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी किंवा रात्री श्रीलंका किनारपट्टी ट्रिंकोमालीजवळील पलीकडे जाईल. तर शुक्रवारी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी चक्रीवादळ मन्नारच्या आखातीमध्ये दिसून येईल आणि दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी कन्नियकुमारी ते पंबान दरम्यान दक्षिण तामिळनाडू ओलांडेल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा जिल्ह्यांसाठी दि. ३ डिसेंबरपासून रेड अलर्ट जारी केला. सदर चक्रीवादळ दि. ४ डिसेंबरपर्यंत दक्षिण तमिळनाडूला पोहोचेल. त्यावेळीच दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पि. विजयन म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चक्रीवादळाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यात केलेल्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील किनाऱ्यावर दि.१ डिसेंबरपासून मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. तर केरळच्या हवामान केंद्राचे संचालक के संतोष यांनी सांगितले की, चक्रीवादळ आज संध्याकाळी किंवा रात्री श्रीलंकेच्या किनारपट्टीवर ओलांडेल. त्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होईल. तसेच आज दक्षिण-उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, दक्षिण-उत्तर केरळ, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप अशा काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.