नवी दिल्ली – भारतीय हवामान विभाग लवकरच वेगवान, प्रभावी चक्रीवादळ इशारा प्रणाली सुरु करणार असल्याची माहिती महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. भारतीय किनारपट्ट्यांवर दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळांमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान कमी करणे हा यामागचा उद्देश आहे.
डॉ मोहपात्रा म्हणाले, जगभरात चक्रीवादळाने होणारे नुकसान वाढत आहे. भारताची विस्तारणारी अर्थव्यवस्था पाहता, मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे कमीत कमी नुकसान होईल यासाठी वेगवान, प्रभाव-आधारीत चक्रीवादळ इशारा प्रणाली या हंगामापासून सुरु करण्यात येईल.
नवीन प्रणालीचा एक भाग म्हणून जिल्हा किंवा विशिष्ट निर्देशांचे इशारे तयार आणि प्रसारित केले जातील ज्यात स्थानिक लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वसाहती, जमीनीचा वापर आणि इतर घटक लक्षात घेऊन माहिती प्रसारीत केली जाईल. सर्व आपत्ती निवारण संस्था संबंधित जिल्ह्यांसाठी कार्टोग्राफिक, भूशास्त्रीय आणि जलविज्ञानविषयक माहितीचा व्यापक वापर करतील.
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधीकरणाने (NDMA), राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (NCRMP) हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत एनडीएमए हवामानखात्याच्या आणि किनारी राज्यांच्या सहकार्याने वेब-आधारीत वेगवान कंपोझिट रिस्क अॅटलस तयार करत आहे.
भारतीय हवामानखात्याने डॉ मृत्यूंजय मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर-डिसेंबर 2020 या चक्रीवादळ हंगामा संदर्भात तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टींग, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, केंद्रीय जल आयोग, आयआयटी दिल्ली, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्विसेस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, एनडीआरएफ, मत्स्य विभाग, पंक्च्युअलिटी सेल, भारतीय रेल्वे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.