भोपाळ – स्मशानभूमी ही अशी एक जागा आहे, जिथे आपण नाईलाज म्हणून जातो. रात्री तर सोडाच पण दिवसा-उजेडी देखील तिथे जाण्याची आपली इच्छा होत नाही. अशा ठिकाणी शाळा भरते, हे वाचून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटलं असेल. चला तर मग, जाणून घेऊया या शाळेविषयी.
मध्य प्रदेशातील सागर येथील स्मशानभूमीत ही शाळा भरते. सागर येथील नरयावली नाक्याजवळच्या झोपडपट्टीत राहणारी ही मुले. केवळ जगण्याची गरज, नाईलाज म्हणून येथे काही लहान मुले येत असत. अंत्ययात्रेत जी पैशांची नाणी टाकली जातात, ती वेचण्यासाठी आणि त्यामुळे पोटाला काहीतरी मिळेल, यामुळे ही मुले स्मशानातील जळत्या चितेशेजारी खेळत असत.
अशातच काही तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले, आणि या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न करायचे ठरवले. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन येथे शाळा सुरू झाली आहे. या मुलांना तेथे केवळ शिक्षणच नाही तर जीवनमूल्य आणि पर्यावरणाबाबतही शिकवण दिली जाते.
मुले चुकली तर त्यांना शिक्षाही दिली जाते. पण ही शिक्षाही त्यांना काही ना काहीतरी शिकवून जाते. काही चूक झाल्यास मुलांना एक झाड लावावे लागते. तरुणांच्या या मेहनतीची फळे आता दिसू लागली आहेत. या मुलांच्या वाईट सवयी आता सुटत चालल्या असून ते शिक्षणात रस घेत आहेत.
या सगळ्या बदलाला कारणीभूत आहेत महाविद्यालयीन शिक्षक महेश तिवारी. त्यांनी या स्मशानाच्या भिंतीलाच फळा बनवून टाकले. त्यांच्या या शाळेत ५ ते १२ वयोगटातील मुले येतात. मुलांना इंग्रजी, हिंदी, गणित, पर्यावरण संरक्षण याशिवाय योग, चित्रकला, गाणं आणि नृत्यही शिकवलं जातं. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकासासाठी देखील प्रयत्न केले जातात.
४५ दिवसांपासून सुरू झालेल्या या शाळेत ८० मुले शिकत आहेत. तर त्यांना ८ शिक्षक शिकवत आहेत. यातील काही मुलांना गुटखा खाणे, अमली पदार्थांचे सेवन अशा काही सवयी होत्या, पण आता शिकायला लागल्याने त्या सुटत आहेत.
(दोन्ही फोटो साभार दै. जागरण)