नवी दिल्ली – सामान्यपणे तुरुंग म्हटला की तेथील वातावरणाचा अंदाज आपण लावू शकतो. पण, तिहार तुरुंगातील वातावरणात थोडे वेगळेपण आहे, आणि ते देखील येथील कैदी आणि तुरुंग प्रशासनाच्या मदतीमुळे आहे. येथील कैदी हे चक्क एक रेडिओ स्टेशन चालवतात. आणि त्यावर कैदी आपली आवडती गाणी ऐकतात. त्यापूर्वी कोरोना काळातील सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सूचनाही दिल्या जातात.
कैद्यांना येथे जे एकटेपण जाणवते, ते दूर करण्यासाठी या एफएम रेडिओ स्टेशनची सुरुवात करण्यात आल्याचे येथील अधिकारी सांगतात. यावरील शो देखील कैदीच करतात. कोरोना काळात यावर अनेक टिप्स देण्यात आल्या. कोरोनापासून बचावासाठी हा उपक्रम तिहार सोबतच रोहिणी आणि मंडोली येथील तुरुंगातही प्रभावी ठरला.
तुरुंगातल्या वातावरणात राहून कैद्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, तसेच बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी तुरुंग प्रशासन सतर्क आहे. हे रेडिओ स्टेशन हा त्याचाच एक भाग आहे. २०१३ मध्ये सुरु झालेले हे स्टेशन येथे फारच लोकप्रिय आहे. याशिवाय, कैद्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील काम दिले जाते. याचबरोबर आता येथे कैद्यांना कायद्याचे देखील ज्ञान दिले जाणार आहे. कायदेतज्ज्ञ त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.