नाशिक – शहर परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे असले तरी महापालिकेने मात्र अजब दावा केला आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल साडेनऊ हजार खड्डे बिजविल्याचे महापालिकेने म्हटले आहे. केवळ मुरुम टाकून सोपस्कार पाडले असून रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खड्ड्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची चिन्हे आहेत.
सिडकाेत २५६३, पंचवटीत १८२५, नाशिकराेड १६३८, सातपूर १४४३, नाशिक पूर्व १११९ आणि पश्चिम मध्ये ८३४ खड्डे बुजविल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जर एवढे खड्डे बुजविले तरी रस्त्यांवर खड्डे कसे दिसत आहेत, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. कुंभमेळ्यात तयार केलेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांची नक्षी तयार झाली असून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.