नवी दिल्ली – खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने चक्क खादी पासून रंग तयार केला आहे. हा रंग नाविन्यपूर्ण, पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेला आहे. हा ‘खादी प्राकृतिक पेंट’ बुरशी रोधक आणि जीवाणू रोधक गुणधर्म असलेले नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. गायीचे शेण या मुख्य घटकावर आधारित हा रंग कमी खर्चातला आणि गंध हीन असून भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केला आहे. त्यामुळे तो घराघरात भिंती रंगविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
खादी प्राकृतिक पेंट, डीस्टेपर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन स्वरुपात उपलब्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत या रंगाचे उत्पादन करण्यात येत आहे.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकल्पाची संकल्पना मार्च २०२० मध्ये मांडली आणि त्यानंतर कुमारप्पा राष्ट्रीय हॅंडमेड पेपर इन्स्टिट्यूट जयपूर या आयोगाच्या युनिटने संकल्पना विकसित केली.
शिसे, पार, क्रोमियम, अर्सेनिक आणि इतर जड धातूपासून हा रंग मुक्त आहे. स्थानिक उत्पादनाला यामुळे चालना मिळणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणा द्वारे शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. पर्यावरण स्नेही उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून गायीच्या शेणाचा वापर वाढून शेतकरी आणि गौशाला यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे. यातून शेतकरी/ गौशाला यांच्यासाठी प्रत्येक पशुमागे वार्षिक सुमारे ३० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. गायीच्या शेणाचा उपयोग केल्याने पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे.
खादी प्राकृतिक डीस्टेपर आणि इमल्शन रंगाच्या नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई, श्री राम औद्योगिक संशोधन संस्था नवी दिल्ली, नॅशनल टेस्ट हाऊस गाझियाबाद या तीन नामांकित प्रयोग शाळांनी चाचण्या केल्या आहेत.
खादी प्राकृतिक इमल्शन BIS 15489:2013 मानकाची तर खादी प्राकृतिक डीस्टेपर BIS 428:2013 मानकाची पूर्तता करतो.