आपण Digiboxx सेवा घेतल्याबरोबर वीस जीबी स्टोरेज फुकट मिळेल. म्हणजेच सध्याच्या गुगल ड्राईव्हच्या किमान १५ जीबी पेक्षा पाच जीबी जास्त. एवढेच नव्हे तर रोज एक रुपया म्हणजे महिन्याला तीस रुपये देण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला दोन टीबीपर्यंत म्हणजेच दोन हजार जीबीपर्यंतची स्पेस मिळेल. इथे दहा जीबीपर्यंतची फाईल तुम्हाला एकावेळी अपलोड करता येईल. दर महिन्याला पैसे द्यायचे नसतील तर थेट वर्षाचे ३६० रुपये तुम्ही एकदम भरू शकता. हे झाले तुमच्याआमच्यासाठी, परंतु उद्योगांसाठी हा दर फार नाही, त्यांना वर्षाला फक्त ९९९ रुपये भरायचे आहेत आणि त्यांना ५० टीबी म्हणजे पन्नास हजार जीबी स्टोरेज मिळेल, मात्र त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या ५० पेक्षा जास्त असता कामा नये.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेखाली Digiboxx निर्माण करण्यात आला आहे. येथे सेव्ह केलेला डाटा इतर कोणालाही सहज शेअर करणे शक्य आहे, तसेच समाजमाध्यमांवरही तो शेअर करता येईल, अशी सोय असल्याचे Digiboxx तर्फे सांगण्यात येते आहे. डिजिटल स्टोरेज क्लाऊड सिस्टीम असल्यामुळे सगळ्यांचा डाटा सुरक्षित आहे, असेही कंपनीचे म्हणणे आहे. भारतात साठ कोटी पेक्षाही अधिक इंटरनेट यूजर्स आहेत त्यांच्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’ आहे असेही Digiboxxचे म्हणणे आहे. मी अजून Digiboxx वापरून पाहिलेला नाही, पण आपण पाहिलात तर मला प्रतिक्रिया जरूर कळवा.
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या वेबसाईटवरुन साभार)